- घरात लग्नकार्य आहे? मग पूर्वतयारीसाठी तुम्ही हे वाचायलाच हवे (Wedding Planning Tips In Marathi)

Monday, March 23, 2020


घरात लग्नकार्य आहे? मग पूर्वतयारीसाठी तुम्ही हे वाचायलाच हवे (Wedding Planning Tips In Marathi)

घरात लग्नकार्य आहे? मग पूर्वतयारीसाठी तुम्ही हे वाचायलाच हवे  (Wedding Planning Tips In Marathi)
‘लग्न पाहावे करुन’ असे म्हणतात ना ते अगदी खरे आहे..नुकतच माझ्या भावाचं लग्न झालं. घरातील पहिलेच लग्न... त्यामुळे घरी सगळ्यांनाच अगदी टेन्शन पण थोडी पूर्वतयारी केली तर लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडते. आता ही पूर्वतयारी काय? कधी करायची? कोणकोणत्या वस्तू घरी आणायच्या असे अनेक प्रश्न साहजिकच आपल्याला पडतात. कपड्यांची शॉपिंग जितकी महत्वाची असते तितकीच महत्वाची असते लग्नकार्यात लागणाऱ्या वस्तूंची खरेदी. लग्न हा एक दिवसाचा सोहळा वाटत असला तरी अनेक विधींचा त्यात समावेश असतो. या विधींसाठी लागणारे सामान, मानपान या सगळ्याची पूर्वतयारी केलीत तर तुम्हाला लग्नाच्या दिवशी होणारा गोंधळ टाळता येईल. आम्ही अशाच काही टीप्स तुमच्यासाठी काढल्या आहेत. मग करायची का सुरुवात?


wedding 10

काय काय करणार? (How To Host Your Wedding At Home)


घरात कोणाचे लग्न ठरले की, त्यानुसार आपण एक एक बेत आखायला घेतो. म्हणजे हल्ली लग्नाआधी प्रीवेडिंग शूट, संगीत,मेहंदी, हळद, रिसेप्शन असे करण्याचा ट्रेंड आला आहे. जर तुम्हाला देखील हे सगळे करायचे असेल किंवा करण्याची इच्छा असेल तर सगळ्यात आधी कुटुंबातील सदस्यांनी एकत्र बसून यावर चर्चा करायला हवी. प्रत्येक कुटुंबाचे लग्नाचे आर्थिक बजेट वेगवेगळे असते. मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नात किती पैसा खर्च करायचा हे देखील ठरवलेले असते. त्या बजेटमध्ये तुम्हाला हे सगळे बसवायचे आहे.त्यामुळे त्याचे आधी नियोजन करुन घ्या.


 wedding

तयारीला लागा (Prep Before Time)


लग्नाला अजून ६ महिने आहेत. घाई करण्याची काहीच गरज नाही. हा विचार मनात कधीच आणू नका. कारण लग्न हा एका दिवसाचा सोहळा तुम्हाला वाटत असला तरी त्या एका दिवसासाठी तुम्हाला बरेच काही करायचे असते. सांगायचे झाले की, लग्नाचा हॉल बुक करणे, कॅटरर्स, डेकोरेटेर्स, फोटोग्राफर,मेकअप आर्टिस्ट, मेहंदी आर्टिस्टशी बोलून ठेवणे अशा बऱ्याच गोष्टी असतात.  त्या सगळ्या गोष्टी करायला बराच वेळ जातो. हॉल निवडण्यातच तुमचे दोन ते तीन महिने निघून जातात. कारण नवरा- नवरी यांना जवळ पडेल. त्यांच्या नातेवाईकांना बरा पडेल, असा हॉल निवडता निवडता नाकी नऊ येतात. हॉल बुक झाल्यानंतर तेथे जेवण कसे आहे? हे देखील चाखून पाहावे लागते. त्यातील आवडलेला पदार्थ फायनल करावा लागतो. शिवाय लग्न घर म्हटले की, थोडीफार लाईटींग आलीच. डेकोरेशन आले त्यामुळे त्यांच्याशी बोलावे लागते. रेट पाहून डेकोरेटर्स फायनल करावे लागते. त्यामुळे लग्न ठरल्यानंतर लागलीच तयारीला लागा.


कपड्यांची खरेदी (Wedding Dress Shopping)


लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस. या दिवशी आपण एकदम परफेक्ट दिसायला हवे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. लग्नाला अजून ५ महिने आहेत. आरामात खरेदी केली तरी चालेल अशा अविर्भावात राहू नका. तुमच्या दोन्ही घरांची नीट बोलणी झाली असेल  तर खरेदीला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. हल्ली सर्रास अनेक ठिकाणी लग्नाचा खर्च अर्धा- अर्धा केला जातो. शिवाय कपड्यांची खरेदीही आपआपली केली जाते. म्हणजे नवरा मुलगा त्याचे कपडे आणि नवरीकडील मंडळी त्यांचे कपडे घेत असतात. त्यामुळे तुम्ही खरेदीला सुरुवात करा. सगळेच कपडे तुम्ही रेडिमेड घ्याल असे होत नाही. तर काही कपडे तुम्हाला शिवून देखील घ्यावे लागतील. वर-वधू दोघांना साधारण एकसारखे दिसणारे कपडे हवे असतात. त्यामुळे ते शोधावेसुद्धा लागतात. त्या दोघांच्या खरेदी व्यतिरिक्त कुटुंबातील इतरांनाही काही कपडे घ्यायचे असतील तर आधीच घ्या. ज्यांना कपडे घेणे शक्य नसेल किंवा त्यांची पसंत नापसंत तुम्हाला माहीत नसेल तर त्यांना सरळ पैसे द्या. पण ते सगळे सोपस्कार आधीच पूर्ण करा.

lehanga

दिवसाचे टाईम टेबल (Plan In Advance)


लग्नाची तारीख ठरल्यानंतर  दिवसाचे टाईमटेबल करणेही महत्वाचे असते. प्रीवेडिंग शूटची तारीख, हळदीची तारीख, मेहंदी, संगीतची तारीख या सगळ्यांचे योग्य नियोजन करण्यासाठी त्याचे टाईमटेबल करा. या टाईमटेबलमध्ये फोटोग्राफर, मेकअप आर्टिस्ट यांची गरज लागणार असेल तर त्यांच्याशी देखील बोलून घ्या. निम्मे काम हलके होईल.

wedding 5


लग्नाला लागणारे सामान (Wedding Accessories)


लग्न म्हणजे दोन कुटुंबाचा मिलाप असतो. लग्नकार्यात दोन कुटुंबांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला पूजाविधीसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी लग्न लावणाऱ्या भटजींकडून मागवून घ्या. उदा. नारळ, फुले, फळे, ब्लाऊज पीस, चांदिची/ तांब्याची भांडी, टोपी, तांदूळ, समई, पाट असे बरेच काही साहित्य लागत असते. त्यामुळे सगळ्यात आधी तुमच्या भटजींशी बोलून सामानाची यादी मागवून घ्या आणि एक एक करुन सामानाची जुळवा जुळव करा. नारळ,फुले या काही गोष्टी वगळता तुम्हाला बाकिचे सामान घ्यायला हरकत नाही.

wedding pooja

वेळा पाळा (Book Parlour In Advance)


लग्नातील महत्वाचा क्षण म्हणजे लग्न लागण्याची वेळ. लग्नाचा दिवस ठरल्यानंतर लग्नाचा मुर्हुत जर सकाळी लवकरचा निवडला असेल तर त्यानुसार तुम्हाला तुमची तयारी करावी लागेल. कारण लग्नात इतर अनेक काम असतात. तुम्हाला चांगलेही दिसायचे असते. त्यामुळे तुम्ही तयारीसाठी तुम्हाला वेळ लागणे देखील स्वाभाविक आहे. तो वेळ तुम्हाला मिळायला हवा. यासाठी जितक्या लवकर तुम्हाला हॉलमध्ये पोहोचता येईल तितक्या लवकर पोहोचा. वधू, वधूची आई, तिची करवली या  सगळ्यांची तयारी सगळ्यात आधी आटपून घ्या. त्यानंतर इतरांची तयारी होऊ द्या. मेकअप आर्टिस्ट बोलावला असेल तर त्यालाही त्याचप्रमाणे तयारी करायला सांगा. दुसऱ्या चेंजच्या बाबतीतही तसेच आहे. वराच्या तयारीला इतका वेळ लागत नाही. पण वधूच्या तयारीला वेळ लागतो. त्यामुळे सगळ्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. कारण मुंबईसारख्या ठिकठिकाणी ट्राफिक असते आणि पुढील सगळी कामे रखडून जातात. त्यामुळे एकच सल्ला की, वेळा पाळा.


wedding time

दागिन्यांची काळजी घ्या (Jewellery Shopping)


वधू असल्यास तिचे बरेच दागिने असतात.सोन्याचे दागिने असल्यास घाईबडीत ते  कुठे ठेवायचा हा गोंधळ होतो. दागिन्यांची जबाबदारीही एका व्यक्तिकडे देऊन ठेवा. त्यामुळे तुमचा गोंधळ होणार नाही. शिवाय अनेकदा बारीक सारीक कामासाठी सुट्टे पैसे हवे असतात. ते जवळ ठेवा. प्रेझेंट पाकिटे जवळ ठेवा. कारण आहेर करताना प्रेझेंट पाकिट हवे असते. त्यामुळे तेही एकाकडे ठेवा.

 wedding 7

पाहुणचार महत्वाचा (Importance Of Hospitality)


लग्न म्हटले की, पाहुणचार आलाच. लग्नाच्या विधींच्यावेळी इतकी धावपळ असते की, अशावेळी पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी कोणीच नसते. घरातील लहान मुलांना, किंवा तुमचे सगळे नातेवाईक ओळखेल अशा व्यक्तिंना त्यासाठी नेमा. कारण पाहुण्यांना आल्यानंतर त्यांना बसवणे. जेवणासाठी विचारपूस करणे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालत नाही.

 wedding 4

मिठाई घेताना (Tips For Perfect Sweet)


घरी शुभकार्य आहे म्हटल्यावर गोड- धोड पदार्थ आलेच. या कालावधीत घरी मिठाई आवर्जून आणली जाते. पण हल्ली गोड खाताना लोक खूप विचार करतात. कारण मिठाईमध्ये असणारी साखर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिने घातक असते. शिवाय अनेक जण हल्ली जीममध्येसुद्धा जातात अशावेळी मिठाई आणताना ती किती आणि कोणत्या प्रकारातली आणायची याचाही थोडा विचार करा. कारण अनेकदा घरात मिठाई खूप आणली जाते. अनेकदा ती वाटली जात नाही. मग ती वाया जाते. त्यामुळे मिठाई घेताना थोडा विचार करुन मगच ती घ्या कारण मग तुमचे पैसे वाया जाणार नाही शिवाय अन्नाचा अपव्यय होणार नाही.

श्रद्धा आणि सबुरी (Patience Is Key)


लग्न म्हटले की, थोडा गोंधळ हा आलाच पण गोंधळून न जाता थोडी शांतता ठेवून घरातील पटकन निर्णय घेऊ शकणाऱ्या व्यक्तिला नेहमी सोबत ठेवा. घरात अशी एक व्यक्ती नेहमीच असते जी अशा प्रसंगी चांगले निर्णय घेऊ शकते. उदा. कित्येकदा  सामानाच्या यादीतील सामान घेऊनही काही तरी आयत्यावेळी राहून जाते किंवा यादीत सांगितलेले नसते. पण ते आयत्यावेळी लागते. अशावेळी ते सामान मिळणे शक्य असेल तर ते आणणे अशावेळी काय निर्णय घ्यायचा ही क्षमता त्या व्यक्तिमध्ये हवी. अशावेळी अनेकदा चीडचीड होणे स्वाभाविक असते.पण अशी चीडचीड होऊ देऊ नका. थोडी श्रद्धा आणि सबुरी ठेवा म्हणजे तुमचे मंगलकार्य निर्विघ्न पार पडेल.

No comments:

Post a Comment